दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या मेळावा बजेटवर भाजपची सोडलं टिकास्त्र
मुंबई - राज्यातील नवरात्र उत्सवाच्या सांगतासोबतच दसऱ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने राजकीय पक्षांची मेळाव्यांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असतो तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचा शिवतीर्थावर होणारा मेळावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून सुरू असलेल्या या परंपरेला पुढे नेत, आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा आयोजित केला जातो. मात्र यंदा या मेळाव्याच्या खर्चावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं असल्याचं पहायला मिळतं. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत दावा केला आहे की, शिवसेना (ठाकरे गट) यंदा दसऱ्याच्या मेळाव्यासाठी तब्बल ६३ कोटी रुपयांचे बजेट ठरवले आहे. उपाध्ये यांनी ही रक्कम उघड करताना ठाकरे गटावर टिकास्त्र सोडलं असल्याचं पहायला मिळतय.

ठाकरे गटाच्या म्हणण्यानुसार, बजेटचे पैसे हे स्टेज सजावट, जाहिराती, सोशल मीडिया प्रचार, लोकांना आणण्यासाठी वाहतूक, आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्था यासाठी खर्च होणार आहेत. मात्र, उपाध्ये यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, या ६३ कोटी रुपयांत मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करता आली नसती का?
उपाध्ये पुढे म्हणतात, बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात लोक स्वतःहून मेळाव्याला येत असत. त्यावेळी विचारांचं सोनं वाटलं जात होतं. पण आता केवळ रडगाणी, चिन्ह चोरलं, पक्ष चोरला अशा गोष्टी ऐकायला कोणी येत नाही, म्हणून गर्दी जमवण्यासाठी इतका खर्च केला जात आहे. भाजपकडून अशी सूचनाही देण्यात आली आहे की, जर ठाकरे गटाला खरोखर लोकांची चिंता असेल, तर हा मेळावा रद्द करून ते पैसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावेत.




