स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार काका - पुतणे एकत्र येणार?

स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार काका - पुतणे एकत्र येणार?

मुंबई - सध्या राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार लगबग सुरू आहे. काही निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी मतदानाची तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात चांगलाच वेग आला असून, मोठे नेतेही स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. विविध आघाड्या आणि युतींसाठी हालचाली सुरू आहेत. राज्यात अनेक ठिकाणी विचारसरणीला बाजूला ठेवून अनपेक्षित आघाड्या आकार घेत आहेत. अशा आघाड्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका – पुतणे पुन्हा एकत्र येणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

या चर्चेला चालना मिळाली आहे ती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या वक्तव्यामुळे. त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात एकत्र येण्याबाबत चर्चा झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित याबाबत शरद पवारांशी बोलणार आहेत आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. बहल यांच्या म्हणण्यानुसार, ही माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत.

यापूर्वीही भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी बीड, चंदगड, बार्शी अशा काही ठिकाणी दोन्ही गटांनी एकत्र येत निवडणुका लढवल्या होत्या. आता सुप्रिया सुळे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे युतीचा प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तानाट्य रंगले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या गटापासून वेगळे होऊन महायुतीसोबत सत्ता स्थापन केली, तर शरद पवारांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले ते म्हणजे एक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली. दरम्यान, या दोन्ही गटांना पुन्हा एकत्र आणण्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू असून, स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना नवसंजीवनी मिळाली आहे.