राज ठाकरेंविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

मुंबई - मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि अमराठी भाषिकांमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून काही अमराठी व्यापाऱ्यांवर आणि हिंदी भाषिक नागरिकांवर मारहाणीचे प्रकार घडल्याची माहिती सोशल मीडियावरून समोर आली आहे. दरम्यान, मराठी भाषेच्या मुद्द्यावर घेतलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर अमराठी लोकांविरुद्ध द्वेष पसरवल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने याचिकेची सुनावणी फेटाळली.
सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यावर टीका करत ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आली असल्याचं स्पष्ट केलं. “याचिकाकर्ते आधी उच्च न्यायालयात का गेले नाहीत? उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का?” असा सवाल करत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
तसेच, या प्रकरणावर याचिकाकर्त्यांनी प्रथम उच्च न्यायालयात जावं, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने याचिका मागे घेण्याचा सल्ला दिला. परिणामी, याचिका मागे घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.