३७४ धावांचा पाठलाग करताना भारताचा निर्धार ठरला निर्णायक

भारत - इंग्लंड क्रिकेट मॅच : भारताने दिलेल्या ३७४ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था एकवेळ ३ बाद ३०१ अशी होती आणि सामना सहज जिंकतील असेच चित्र होते. मात्र, शेवटपर्यंत झगडत भारताने हा सामना सहा धावांनी जिंकला. या विजयामागचं खरे कारण काय, हे मोहम्मद सिराजने सामन्यानंतर स्पष्ट केलं.
सिराज म्हणाला, "पाचवा सामना अत्यंत थरारक होता. इंग्लंडची स्थिती चांगली होती. ३ बाद ३०१, आणि आम्हाला वाटलं ही लढत निसटते. पण एक गोष्ट ठरवली होती की, हार मानायची नाही. आम्ही ठरवलं होतं की चेंडू योग्य ठिकाणी टाकायचा आणि इंग्लंडच्या फलंदाजांना चुका करायला लावायचं. तोच निर्धार आम्हाला विजयापर्यंत घेऊन गेला."
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने १ बाद ५० अशी सुरुवात केली होती. रविवारी सकाळी बेन डकेटने अर्धशतक पूर्ण केलं, पण त्याच्यावर आधीपासून दबाव निर्माण करून ठेवलेल्या सिराज आणि आकाशदीपमुळे प्रसिध कृष्णाने त्याला झेलबाद करत महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवला. डकेटने ८३ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या.
यानंतर ओली पोपने जलद सुरुवात केली, मात्र सिराजच्या अचूक लेंथवर तो पायचीत झाला. त्यावेळी इंग्लंडची ३ बाद १०६ अशी स्थिती होती. जरी भारत थोडं वरचढ वाटत होता, तरी त्यानंतर ब्रुक आणि रूटने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.
या जोडीने दुसऱ्या सत्रात १९५ धावांची भागीदारी रचली. ब्रुकने केवळ ९१ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत आक्रमक खेळी केली. रूटसुद्धा त्याला उत्तम साथ देत होता. त्यांचे बॅझबॉल शैलीतील फटके भारतीय संघाला पुरते गोंधळात टाकत होते. चहापानावेळी इंग्लंड ४ बाद ३१७ वर पोहोचला होता आणि सामना त्यांच्या बाजूने झुकलेला वाटत होता.
मात्र, त्यानंतर आकाशदीपने ब्रुकला बाद करत भारताला परत संधी दिली. ब्रुकने १११ धावा (९८ चेंडू, १४ चौकार, २ षटकार) केल्या. त्यानंतर प्रसिध कृष्णाने जॅमी स्मिथचा त्रिफळा उडवला आणि सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकू लागले.
पावसामुळे काही काळ खेळ थांबवण्यात आला असला, तरी भारताच्या गोलंदाजांनी संयम आणि अचूकता दाखवत इंग्लंडला दबावाखाली आणलं. शेवटी हा सामना केवळ सहा धावांनी भारताने जिंकला आणि त्यामागचं कारण, ‘हार मानायची नाही’ हीच भावना, असं सिराजने सांगितलं.