भारत - इंग्लंड कसोटी मालिका : दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल

भारत - इंग्लंड कसोटी मालिका : दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल

India - England Cricket Match - भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये झाला, ज्यामध्ये भारताला पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. आता मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवला जात आहे.

या सामन्याची नाणेफेक इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे.

भारतीय संघात या सामन्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यांच्या जागी आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच साई सुदर्शनऐवजी नवा चेहरा नितीश कुमार रेड्डी याला संघात घेतले आहे.

इंग्लंडने मात्र आपला संघ कायम ठेवत कोणताही बदल केलेला नाही. त्यांनी सामन्याआधीच अंतिम 11 खेळाडू जाहीर केले होते.

भारताचा एजबॅस्टनवरील इतिहास फारसा आशादायक नाही. येथे त्यांनी आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, त्यातील 7 सामने गमावले असून, एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे दुसरा सामना भारतासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. जर या सामन्यातही भारत पराभूत झाला, तर ते मालिकेत 0-2 ने पिछाडीवर जातील आणि पुनरागमन अधिक कठीण होईल.

भारताचे अंतिम 11 खेळाडू : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. 

इंग्लंडचे अंतिम 11 खेळाडू : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशी