भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी - 20 मालिका सुरू ; ऑस्ट्रेलियाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी - 20 मालिका सुरू ; ऑस्ट्रेलियाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

मुंबई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी - 20 मालिका सुरू झाली असून, पहिला सामना मनुका ओव्हल येथे खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर भारताचा कर्णधार सूर्याकुमार यादव म्हणाला, आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती. आम्ही याबद्दल आधी चर्चा केली होती. येथे पिच दिवसाच्या शेवटी थोडं स्लो होतं, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारून प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणायचा आमचा प्रयत्न आहे. संघ निवडणे खूप कठीण होते.

दरम्यान, भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी पहिल्या तीन टी - 20 सामन्यांसाठी बाहेर पडला आहे. अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याला डाव्या क्वाड्रिसेप्समध्ये दुखापत झाली होती आणि आता त्याने मानेच्या दुखण्याचीही तक्रार केली आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्श म्हणाला, “आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. ही पिच फलंदाजीसाठी चांगली आहे, त्यामुळे आम्ही सुरुवातीला भारताला रोखण्याचा प्रयत्न करू. भारत एक मजबूत संघ आहे, पण आम्ही त्यांना कमी धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

अलीकडेच दोन्ही संघांमध्ये झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 ने विजय मिळवला होता. आता भारताचा उद्देश टी-20 मालिकेत विजय मिळवण्याचा आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 8 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

भारतीय संघ: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्याकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघ: मिचेल मार्श (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, जॉश इंग्लिश, टीम डेविड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोस फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमॅन आणि जॉश हेझलवुड.