वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉलसाठी निवड चाचणीत सहभागी व्हा - विद्या शिरस

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉलसाठी निवड चाचणीत सहभागी व्हा -  विद्या शिरस

कोल्हापूर (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाव्दारा वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल (15 वर्षाखालील मुले आणि मुली) चॅम्पियनशिप 4 ते 13 डिसेंबर 2025 या कालावधीत चीनमधील शांग्लुओ येथे होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे खेळाडू सहभागी होण्यासाठी माहे ऑगस्ट 2025 च्या तिसऱ्या आठवड्यात पुणे येथे राज्य निवड चाचणी घेण्यात येणार आहे. तद्अनुषंगाने विभागीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. आपल्या असोसिएसनच्या अधिनस्त असलेल्या संस्था, शाळा, महाविद्यालय, मंडळातील खेळाडूंनी या विभागीय निवड चाचणीमध्ये सहभागी व्हावे, असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. 

या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार असून, भारतीय संघाची निवड करण्यासाठी भारतीय शालेय महासंघाकडून 25 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत राष्ट्रीय निवड चाचणीचे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. 

निवड चाचणीसाठी पात्रता / निकष -

खेळाडूचा जन्म 1 जानेवारी 2010 किंवा त्यानंतर झालेला असावा,  1 जानेवारी 2010 पुर्वी तसेच 1 जानेवारी 2014 व त्या नंतर जन्मलेले खेळाडू चाचणीसाठी पात्र असणार नाहीत.

निवड चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे -

शासकीय विभागाने वितरीत केलेला मूळ जन्म दाखला (इंग्रजी मधील) सादर करणे अनिवार्य आहे. राष्ट्रीय चाचणी वेळी किमान 6 महिने व्हॅलीडीटी शिल्लक असलेला भारतीय पासपोर्ट असणे अनिवार्य राहील. तसेच विभागीय चाचणी वेळी पासपोर्ट विभागाकडे तात्काळ पासपोर्ट मिळण्यासाठीचा अर्ज केल्याचा पुरावा सादर करणे अनिवार्य आहे.