आधार कार्ड लॉक - अनलॉक सुविधा नक्की आहे तरी काय..?
Aadhar Card Feature - आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे. बँकिंग, सरकारी योजना, मोबाईल सिम अशा अनेक कामांसाठी आधारचा वापर केला जातो. आधारमध्ये वैयक्तिक व संवेदनशील माहिती असल्यानं त्याची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन UIDAI कडून आधार कार्ड लॉक व अनलॉक करण्याची उपयुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना आपल्या आधार कार्ड नंबरच्या वापरावर पूर्ण नियंत्रण मिळतं.

आधार लॉक केल्यावर काय बदल होतो ?
आधार लॉक केल्यावर कोणत्याही प्रकारचं ऑथेंटिकेशन बायोमेट्रिक, डेमोग्राफिक किंवा OTP होऊ शकत नाही. कोणतीही संस्था आधार कार्ड नंबरच्या आधारे ओळख पटवू शकत नाही. मात्र, १६ अंकी व्हर्च्युअल आयडी (VID) वापरून सेवा घेता येतात. हा VID तात्पुरता असून तो आधारशी जोडलेला असतो.
आधार कार्ड लॉक करण्याचे दोन सोपे मार्ग -
१) UIDAI च्या वेबसाईटवरून -
- https://uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्या
- My Aadhaar सेक्शनमध्ये जाऊन Aadhaar Lock & Unlock वर क्लिक करा
- UID Lock पर्याय निवडून आधार नंबर, नाव व पिनकोड टाका
- OTP किंवा mAadhaar अॅपमधील TOTP वापरून प्रक्रिया पूर्ण करा
- आधार लॉक झाल्याचा संदेश मोबाईलवर मिळतो
२) mAadhaar अॅपद्वारे -
- Google Play Store किंवा Apple App Store वरून mAadhaar अॅप डाउनलोड करा
- नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेल्या OTP ने लॉग इन करा
- Services मध्ये जाऊन Aadhaar Lock/Unlock निवडा
- Lock Aadhaar वर क्लिक करून आवश्यक तपशील भरा
आधार अनलॉक कसा कराल?
आधार अनलॉक करण्यासाठी १६ अंकी नवीन VID आवश्यक असतो. VID विसरल्यास SMS सेवेद्वारे तो पुन्हा मिळवता येतो.
- UIDAI वेबसाईटवर जाऊन Unlock पर्याय निवडा
- नवीन VID व सिक्युरिटी कोड टाका
- OTP किंवा TOTP द्वारे सत्यापन करा
- प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आधार अनलॉक होतो
आधारचा गैरवापर टाळण्यासाठी वापर नसताना आधार लॉक ठेवणं अधिक सुरक्षित ठरू शकतं. वैयक्तिक माहितीच्या संरक्षणासाठी UIDAI ची ही सुविधा नागरिकांनी आवर्जून वापरावी, असं आवाहन करण्यात येत आहे.




