‘खरी शिवसेना’ कोणाची ठाकरेंची की शिंदेची ; सुप्रीम कोर्टात तारीख ठरली सुनावणीची

‘खरी शिवसेना’ कोणाची ठाकरेंची की शिंदेची ; सुप्रीम कोर्टात तारीख ठरली सुनावणीची

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आणि त्यातून 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' या नव्या पक्षाचा उदय झाला. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं मूळ नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं असलं, तरी उद्धव ठाकरे यांनी अद्याप शिवसेनेवरील दावा सोडलेला नाही. त्यांनी हा वाद थेट सुप्रीम कोर्टात नेला आहे. आता या प्रकरणावर कोर्टाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मालकीवरची सुनावणी 8 ऑक्टोबरला होण्याची शक्यता संगणकीय प्रणालीत नोंदवण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून झाल्यावर सुप्रीम कोर्ट अंतिम निर्णय देईल. त्यामुळे ‘खरी शिवसेना’ कोणाची यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यातील अधिकाराच्या वादावर देखील सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राष्ट्रपतींनी यासंदर्भात न्यायालयाचा सल्ला मागितला असून, या प्रकरणासाठी विशेष घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे या पीठाचे सदस्य असून, या प्रकरणाची सुनावणी 19 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचमुळे शिवसेना प्रकरणाची सुनावणी काहीशी लांबणीवर गेली आहे.

राज्यात अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. त्याआधीच शिवसेना पक्ष व चिन्हाच्या वादाचा निकाल येणार असल्याने, या निकालाचा स्थानिक निवडणुकांवर थेट परिणाम होऊ शकतो.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने कोर्टात सुनावणी लवकर घेण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी, "या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. आम्ही आता यावर एकदाच निकाल देणार आहोत," असे स्पष्ट केले होते. 20 ऑगस्ट रोजी सुनावणी ठरवण्यात आली होती, मात्र ती पुढे ढकलली गेली असून, आता ऑक्टोबरमध्ये अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.