UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी ; 1 ऑक्टोंबरपासून नवीन नियम लागू

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी ; 1 ऑक्टोंबरपासून नवीन नियम लागू

मुंबई - नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जाहीर केले आहे की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मधील पीअर-टू-पीअर (P2P) 'कलेक्ट रिक्वेस्ट' फीचर 1 ऑक्टोबर 2025 पासून बंद करण्यात येणार आहे. हे पाऊल आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी उचलण्यात आले आहे. 'कलेक्ट रिक्वेस्ट' हे फीचर वापरून कोणीही दुसऱ्याकडून पैसे मागू शकतो. मात्र, सायबर गुन्हेगार त्याचा गैरवापर करून वापरकर्त्यांना फसवून पैसे उकळत होते. त्यामुळे NPCI ने हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

NPCI ने 29 जुलै रोजी जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, "1 ऑक्टोबर 2025 नंतर P2P कलेक्ट रिक्वेस्ट प्रक्रिया केली जाणार नाही." सध्या या फीचरद्वारे एका व्यक्तीकडून दिवसाला 2,000 रुपये मर्यादेपर्यंत आणि एकूण 50 यशस्वी व्यवहार करता येतात. तथापि, व्यापारी (merchants) आपल्या ग्राहकांकडून पेमेंटसाठी 'कलेक्ट रिक्वेस्ट' वापरू शकतील. हे फीचर ग्राहकांना थकीत पेमेंटची आठवण करून देण्यासाठी सुरू ठेवले जाईल.

NPCI ने सर्व बँका आणि UPI अ‍ॅप्सना निर्देश दिले आहेत की, ते P2P कलेक्ट रिक्वेस्ट न वापरता, त्याची प्रक्रिया थांबवावी. हे फीचर सुरुवातीला मित्र किंवा कुटुंबियांना पैसे मागण्यासाठी डिझाइन करण्यात आले होते. मात्र, UPI मध्ये 'स्प्लिट पेमेंट' सारख्या पर्यायांमुळे याचा वापर घटला आहे.

UPI ही सध्या भारतातील सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्रणाली असून, दरमहा सुमारे 20 अब्ज व्यवहारांवर प्रक्रिया करते. याचे एकूण मूल्य सुमारे 25 लाख कोटी रुपये असून, देशात सुमारे 400 दशलक्ष युजर्स UPI वापरत आहेत. NPCI चा हा निर्णय UPI व्यवहारांची सुरक्षितता वाढवण्याचा आणि वापरकर्त्यांना फसवणुकीपासून संरक्षण देण्याचा प्रयत्न आहे.