भारताला 'या' कारणामुळे फटका बसण्याची शक्यता

भारताला 'या' कारणामुळे फटका बसण्याची शक्यता

अमेरिका - रशिया युद्ध : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी रशियाच्या सीमेजवळ दोन अणु पाणबुड्या तैनात केल्या असून, रशियाकडून खनिज तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा फटका भारतालाही बसण्याची शक्यता आहे, कारण भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो. ट्रम्प लवकरच रशियावर व्यापक आर्थिक निर्बंध लागू करणार असल्याचे संकेत दिले आहेत. अशा निर्बंधांमुळे खनिज तेलाच्या दरात लक्षणीय वाढ होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या तेलाचा आंतरराष्ट्रीय दर प्रति बॅरल ६७.४० डॉलर इतका आहे. मात्र, हा दर १२० डॉलरपर्यंत जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबविल्यास सुमारे ९६ हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसू शकतो.

व्हेंच्युरा कमोडिटीजचे सीआरएम प्रमुख एन. एस. रामास्वामी यांनी तेलाच्या भविष्यातील दराविषयी अंदाज मांडला. त्यांच्या मते, ब्रेंट क्रूडचे दर ऑक्टोबर २०२५ पर्यंत ७६ डॉलर प्रति बॅरल राहू शकतात, तर वर्षअखेरीस हे दर ८२ डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. सप्टेंबरमध्ये हे दर ६९.६५ डॉलरवरून ७६ - ७९ डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

रशियाकडून दररोज ५० लाख बॅरल तेलाची निर्यात केली जाते. जर रशिया आपली निर्यात कमी करत असेल किंवा इतर देश अमेरिकेच्या दबावामुळे तेल खरेदी थांबवत असतील, तर तेलाचे दर १०० ते १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढू शकतात.

भारत आपल्या तेल गरजांपैकी सुमारे ३५ ते ४० टक्के तेल रशियाकडून आयात करतो. त्यामुळे दरवाढीचा मोठा परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात ४० पेक्षा अधिक देशांकडून तेल खरेदीचे पर्याय उपलब्ध असले तरीही दरवाढ अपरिहार्य ठरू शकते.