‘अरण्य’ चा रहस्यमय मोशन पोस्टर प्रदर्शित ; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘अरण्य’ चा रहस्यमय मोशन पोस्टर प्रदर्शित ; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई - एस एस स्टुडिओ निर्मित ‘अरण्य’ या आगामी मराठी चित्रपटाचं दमदार मोशन पोस्टर नुकतंच प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आलं आहे. शरद पाटील आणि अंजली पाटील यांच्या निर्मितीत तयार झालेला हा चित्रपट अमोल दिगांबर करंबे यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. हार्दिक जोशी, वीणा जगताप, हृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अरण्य’ 19 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मोशन पोस्टरमध्ये गूढतेने भरलेलं, दाट झाडांनी वेढलेलं जंगल, त्यावर पसरलेलं धुके आणि त्यामागचं रहस्य प्रेक्षकांना थक्क करतं. विशेष म्हणजे, हार्दिक जोशी यांच्या प्रभावी लूकमध्ये चेहरा अंशतः झाकलेला, डोळ्यांत संताप आणि निर्धार विशेष लक्ष वेधून घेतो. जंगलाच्या पार्श्वभूमीतील हे दृश्य एक खोल संघर्ष आणि अनकही कहाणी सुचवतं.

दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांच्या मते, ‘अरण्य’ ही फक्त जंगलाची गोष्ट नाही, तर ती माणसाच्या अस्तित्वाशी, निसर्गाशी असलेल्या नात्याची आणि त्यात निर्माण झालेल्या संघर्षाची सखोल मांडणी आहे. ते म्हणतात, "या अरण्यात प्रत्येक सजीवामागे एक इतिहास आहे. कधी शांत, तर कधी रक्तरंजित. प्रेक्षकांनी या जंगलाचा गंध, त्याची ओलसरता, आणि सावलीतील गूढता अनुभवली पाहिजे. ‘अरण्य’ हा एक अनुभव आहे बाह्य नव्हे, तर अंतर्मनातील."

चित्रपटाचे निर्माते शरद पाटील सांगतात, "आजच्या काळात तंत्रज्ञान, थरार आणि भावना यांचा समतोल साधणारे चित्रपट दुर्मीळ झालेत. ‘अरण्य’ करताना आमचं उद्दिष्ट होतं की प्रेक्षक फक्त बघणार नाहीत, तर हे जंगल ‘अनुभवतील’. प्रत्येक फ्रेम, प्रत्येक संवादातून आम्ही एक सत्य सांगतो आहोत. जे जरी दडलेलं असलं, तरी नजरेआड गेलेलं नाही. आम्हाला विश्वास आहे, की ‘अरण्य’ प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करेल."