ऑनलाईन रम्मी गेमच्या जाहिरातीवर अभिनेता स्वप्नील जोशी काय म्हणाला..?

मुंबई - देशात बेकायदेशीर ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगार अॅप्सचा प्रसार वेगानं वाढत असून, हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विशेषतः तरुण पिढी याच्या आहारी जात असून, कष्टानं कमावलेला पैसा या आभासी सट्टेबाजीत गमावण्याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने या विषयावर भाष्य करताना स्वतः ची चूक मान्य केली आहे. धाराशिव दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “मी पाच वर्षांपूर्वी एका रम्मी गेमची जाहिरात केली होती, पण नंतर मला त्याचे परिणाम लक्षात आल्यावर ती जाहिरात थांबवली. यापुढे मी अशा कोणत्याही अॅप्सची जाहिरात करणार नाही.” स्वप्नीलने हे पाऊल फक्त कलाकार म्हणून नव्हे, तर जबाबदार नागरिक म्हणून उचलल्याचंही स्पष्ट केलं.
गेल्या काही वर्षांत अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी या सट्टेबाजी अॅप्सची जाहिरात केल्यामुळे ही व्यसनात्मक संस्कृती शहरांबरोबरच खेड्यापाड्यांमध्येही पसरली आहे. त्यामुळे आता अशा जाहिरातदार सेलिब्रिटींवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
धाराशिवमधील दुर्दैवी घटना आणि वाढती चिंता -
ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेलेल्या धाराशिव जिल्ह्यातील लक्ष्मण मारुती जाधव या तरुणाने आपलं संपूर्ण आयुष्य गमावलं. घर आणि शेती विकल्यानंतरही कर्ज फेडता न आल्याने त्याने स्वतः च्या गरोदर पत्नीला आणि दोन वर्षांच्या मुलाला विष देऊन हत्या केली, आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे आणि ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.