‘बॉर्डर’ मधील ‘संदेसे आते हैं’ या गाण्यामागची स्टोरी तुम्हाला माहित आहे का..?
मुंबई - सध्या बॉर्डर 2 या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, पहिल्या बॉर्डर चित्रपटाशी जोडलेल्या अनेक आठवणी पुन्हा ताज्या होत आहेत. विशेषतः ‘संदेसे आते हैं’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या गाण्याचा वापर बॉर्डर 2 या सिक्वेलमध्येही करण्यात आला आहे. ‘संदेसे आते हैं’ या अजरामर गाण्यामुळे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. तब्बल नऊ मिनिटांचे हे गाणे १९७१ च्या भारत - पाकिस्तान युद्धातील लोंगेवाला लढाईत सहभागी झालेल्या जे.पी. दत्ताच्या भावाच्या अनुभवांवर आधारित होते.

१९९७ साली भारत ५० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत होता. त्यावेळी देशातील सामाजिक आणि राजकीय वातावरणही वेगळे होते. बॉलीवूडमध्येही देशभक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. जे.पी. दत्त यांचा बॉर्डर आणि सुभाष घई यांचा परदेस हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशभक्तीची भावना अधिक तीव्र झाली.
बॉर्डर हा चित्रपट १९७१ च्या भारत - पाकिस्तान युद्धातील लोंगेवाला लढाईवर आधारित होता. चित्रपटातील ‘संदेसे आते हैं’ हे गाणे जावेद अख्तर यांच्या भावस्पर्शी शब्दांनी सजले होते, तर अनु मलिक यांनी त्याला संगीत दिले होते. हिंदी चित्रपटसंगीताच्या इतिहासात नऊ मिनिटांचे गाणे ही मोठी गोष्ट मानली जाते.
या गाण्याबद्दल बोलताना जावेद अख्तर यांनी सांगितले होते की, सुरुवातीला या गाण्याचे बोल त्यांना खूप भयावह वाटले होते. ते एखाद्या कवितेसारखे न वाटता जणू पटकथेचा भाग असल्यासारखे भासत होते. मात्र संगीत तयार करताना अनु मलिक भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. तेव्हा जे.पी. दत्त यांनी म्हटले, हे अश्रूच तुला योग्य संगीत तयार करण्यास मदत करतील. आजही ‘संदेसे आते हैं’ हे गाणे भारताच्या कानाकोपऱ्यात ऐकायला मिळते आणि प्रत्येक वेळी देशभक्तीची भावना जागृत करते.




