बीड हादरलं ; 'त्या' तरूणीसोबत परळी स्टेशनवर घडली धक्कादायक घटना

बीड हादरलं ;  'त्या' तरूणीसोबत परळी स्टेशनवर घडली धक्कादायक घटना

बीड - बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील अस्वलांबा गावात एका परप्रांतीय 20 वर्षीय तरुणीवर तिघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून, चौथ्या संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी रेल्वेने मुंबईहून हैदराबादकडे जात असताना परळी स्टेशनवर उतरून एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबली होती. तेथे तिची भेट परिसरातील तृतीयपंथी पूजा गुट्टे हिच्याशी झाली. पूजा हिने तिची ओळख वाढवत तरुणीला कामाचे आमिष दाखवले आणि तिच्या सोबत सतीश मुंडे, मोहसीन पठाण यांना संपर्क करून, त्या तिघांनी पीडितेला मोटरसायकलवरून अस्वलांबा गावातील भागवत कांदे याच्या घरी नेले.

तेथे या तिघांनी पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान, गावातील एका सजग नागरिकाने प्रसंगाची गंभीरता ओळखून पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सतीश मुंडे, मोहसीन पठाण आणि भागवत कांदे या तिघांना अटक केली आहे. पूजा गुट्टे या तृतीयपंथी संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.

या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. कायदा - सुव्यवस्थेवरील नियंत्रण ढासळत चालल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलिस आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून कठोर कारवाई अपेक्षित आहे. तसेच, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून या घटनेची गंभीर दखल घेऊन ठोस उपाययोजना केल्या जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.