मनसे - शिवसेनेत युती होण्याआधीच पडली वादाची ठिणगी

मुंबई - राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात संभाव्य युतीबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील पायाभूत समस्या जसे की रस्त्यांवरील खड्डे, पाणीपुरवठ्याची अनियमितता, वाढती गुन्हेगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा झाली. मात्र, चर्चेदरम्यान शिवसेना (ठाकरे गट) चे नेते जयंत दिंडे आणि माजी महापौर विनायक पांडे यांच्यात विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून तीव्र वाद झाला.
जयंत दिंडे यांनी आपल्या भाषणात 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील नाशिक मध्यम मतदारसंघातील पराभवासाठी प्रचारातील काही चुका जबाबदार असल्याचे मत मांडले. विशेषतः ‘एमडी ड्रग्ज’ सारख्या मुद्द्यांची चुकीची मांडणी ही एक महत्त्वाची चूक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर पांडे, जे वसंत गीते यांचे निकटवर्तीय आहेत, यांनी तीव्र आक्षेप नोंदवत, “आम्ही नेमकं चुकलो तरी कुठे?” असा सवाल उपस्थित केला.
वाद इतका वाढला की संतप्त झालेल्या विनायक पांडे यांनी बैठक अर्धवट सोडून निघून जाणे पसंत केले. यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. नंतर दिंडे यांनी क्षमा मागत विषय शांत करण्याचा प्रयत्न केला.
या वादामुळे नाशिकमध्ये संभाव्य युतीविषयीच्या चर्चांना नव्याने उधाण आले असून, मनसे - शिवसेना युतीसंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.