परभणी-हिंगोली विधानपरिषद : महायुतीत शिंदेंच्या जागेवर भाजप-राष्ट्रवादीची नजर; मविआत काँग्रेसच्या जागेवर उबाठाचा दावा
मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर करताच परभणी-हिंगोली जिल्ह्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. या मतदारसंघावर सध्या महायुतीमधील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व असले, तरी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंच्या मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. जागा एक आणि दावेदार अनेक अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांनी आता थेट मुंबई गाठून जोरदार लॉबिंग सुरू केली आहे.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विप्लव बाजोरिया हे आमदार होते. त्यामुळे परंपरेनुसार या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा नैसर्गिक दावा आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपल्या संख्याबळाचा हवाला देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि भारतीय जनता पक्षाने देखील या जागेवर दावा ठोकला आहे. यामुळे महायुतीमधील तिन्ही पक्ष या एकाच जागेसाठी समोरासमोर ठाकले आहेत.
2026 महायुतीमधील प्रमुख इच्छुक चेहरे :
शिंदे शिवसेना: विप्लव बाजोरिया, अल्पसंख्याक नेते सईद खान, राम कदम, आनंद भरोसे.
अजित पवार राष्ट्रवादी: माजी आमदार विजय भांबळे, सुरेश नागरे.
भाजप: संतोष मुरकुटे, मिलिंद यंबल, माजी आमदार गजानन घुगे.
दुसरीकडे, विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीतही (MVA) आलबेल नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही निवडणुकांचा इतिहास पाहता या मतदारसंघात काँग्रेसचे पारडे जड राहिले आहे. मात्र, यावेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने थेट काँग्रेसच्या जागेवर दावा केला आहे.




