आबिटकर नॉलेज सिटीमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

आबिटकर नॉलेज सिटीमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

'विकसित भारता'साठी युवा पिढीने योगदान देण्याचे प्रा. अर्जुन आबिटकर यांचे आवाहन

गारगोटी (प्रतिनिधी): देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन आबिटकर नॉलेज सिटीमध्ये अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भुदरगड तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष बी. एस. माने यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीताच्या गजरात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

 

या सोहळ्यास भाई आनंदराव आबिटकर आणि संस्थेचे अध्यक्ष प्रा. अर्जुन आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांना संबोधित करताना प्रा. अर्जुन आबिटकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा ऐतिहासिक प्रवास आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. "आगामी 'विकसित भारता'चे भविष्य हे युवा पिढीच्या हाती आहे," असे प्रतिपादन करत त्यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. उमेश पाटील आणि कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या दिपाली गोसावी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

या सोहळ्याला पालच्या सरपंच ज्योती सुतार, उपसरपंच दिगंबर देसाई, अंकुशबापू चव्हाण, गारगोटीचे उपसरपंच भरत शेटके, अरुणराव शिंदे, सर्जेराव मोरे, प्रशांत भोई, विजय सारंग, व्ही. के. कदम, चंद्रकांत चव्हाण, रणधिर शिंदे, सुरेशराव सूर्यवंशी आणि राजू चिले यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कविता कुरळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. स्मिता मोहोळकर यांनी पार पाडले.