डॉ. दिनेश बारी यांना गृह मंत्रालयाचे 'उत्कृष्ट सेवा पदक'; २१ वर्षांच्या सेवेचा राष्ट्रीय सन्मान

डॉ. दिनेश बारी यांना गृह मंत्रालयाचे 'उत्कृष्ट सेवा पदक'; २१ वर्षांच्या सेवेचा राष्ट्रीय सन्मान

कोल्हापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र पोलीस दलात कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि संवेदनशीलतेने आपली ठसठशीत ओळख निर्माण करणारे पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश गिरधर बारी यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून 'उत्कृष्ट सेवा पदक' प्रदान करण्यात आले आहे. पोलीस दलातील २१ वर्षांच्या निष्कलंक व उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील बहुमान मिळाला असून, यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

संवेदनशील विभागांमध्ये प्रभावी काम
२४ मे २००५ रोजी पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवेत रुजू झालेल्या डॉ. बारी यांनी गोंदियासारखा नक्षलग्रस्त भाग, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, राज्य राखीव पोलीस दल, कोल्हापूर, गुन्हे अन्वेषण विभाग आणि 'फोर्स वन'च्या नागरी दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्रात (UCTC) अत्यंत जबाबदारीने काम पाहिले. 'फोर्स वन'मध्ये पोलीस अधीक्षक असताना त्यांनी आधुनिक कमांडो प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पोलीस संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळवून दिले.

कोल्हापूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करतानाच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले. त्यांच्या याच कार्यशैलीमुळे कोल्हापूरकरांनी त्यांना मनापासून आदराचे स्थान दिले.

यापूर्वीही त्यांना नक्षलग्रस्त भागातील विशेष सेवा पदक, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, आणि सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या टाक बॅचसह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.