हायकोर्ट लिपिक परीक्षेत गडबड ; विद्यार्थ्यांचे आंदोलन

हायकोर्ट लिपिक परीक्षेत गडबड ; विद्यार्थ्यांचे आंदोलन

कल्याण: मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या टायपिंग टेस्ट दरम्यान कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केट परिसरातील परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. महाराष्ट्रभरातून आलेल्या हजारो उमेदवारांना परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ आणि तांत्रिक त्रुटींमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या अपयशी नियोजनाच्या विरोधात २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या मांडत तीव्र निषेध नोंदवला.

 

तांत्रिक अडचणी अन् असुविधांचा पडला खच
परीक्षेसाठी सीटींग अरेंजमेंटचे कोणतेही योग्य नियोजन नसल्याचा आणि सुरक्षा तपासणीचा अभाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. केंद्रामधील अनेक संगणक बंद अवस्थेत होते, तर काही संगणक सुरू झाल्यानंतर सर्व्हर डाऊन झाल्याने टायपिंग टेस्ट पूर्णपणे रखडली. तांत्रिक बिघाडामुळे सकाळी १० वाजताच्या सत्रातील उमेदवार अडकून पडले, तर पुढील सत्रातील शेकडो विद्यार्थीही केंद्रावर पोहोचल्याने गर्दीचा मोठा तणाव निर्माण झाला.

याशिवाय, केंद्रावर पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांचा तीव्र अभाव असल्याने लांबवरून आलेल्या उमेदवारांचे आणि त्यांच्या पालकांचे हाल झाले.

परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी
परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आणि वातावरण नियंत्रणात आणले. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे प्रिंट प्रक्रियेला उशीर होत असून समस्या सोडवण्याचे काम सुरू असल्याचे संस्थेचे संचालक संजय वानखेडे यांनी सांगितले. मात्र, झालेला गोंधळ लक्षात घेता ही परीक्षा रद्द करून पुन्हा पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी, अशी आक्रमक मागणी संतप्त विद्यार्थी व पालकांनी केली आहे.