अमेरिका-इराण युद्धामुळे नगर-मनमाड रस्ता रखडला; ट्रम्पसारखा वेडा माणूस पाहिला नाही ; सुजय विखेंचे अजब वक्तव्य
राहुरी:नगर दक्षिणचे माजी खासदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत अत्यंत वादग्रस्त आणि अजब वक्तव्य केले आहे. "अमेरिका-इराण युद्धामुळे डांबराचा तुटवडा निर्माण झाला असून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही," अशी थेट टीप टिप्पणी विखे यांनी राहुरी येथील तिरंगा रॅलीदरम्यान केली.

नगर-मनमाड रस्त्याच्या कामातील दिरंगाईबाबत बोलताना विखे म्हणाले, "युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा तुटवडा जाणवत असून रस्त्यांसाठी डांबर थेट दिल्लीवरून आणावे लागत आहे. त्यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहेत. मी मेंदूचा डॉक्टर आहे, पण राजकारणात आल्यावर माझाच मेंदू खराब झाला." नगर जिल्ह्यात ४० हजार कोटींची विकासकामे केल्याचा दावा करत, "नगर–मनमाड रस्ता फक्त सुजय विखेच पूर्ण करू शकतो; त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवावा," असे आवाहन त्यांनी केले.
सामाजिक माध्यमांवर पोस्ट करून किंवा आंदोलने करून रस्त्याचे काम होणार नाही, असे सांगत विखे यांनी ट्रम्प यांच्या युद्धनीतीला नगरच्या रस्त्यासाठी जबाबदार धरल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.




