...तर गोपीनाथ मुंडेंचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, 'इडियट' वक्तव्यावरून सरकारवर सडकून टीका
मुंबई (विशेष प्रतिनिधी): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ उठले आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, "...तर गोपीनाथ मुंडे यांचे प्राण वाचले असते," असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.

गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ – संजय राऊत
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "गोपीनाथ मुंडे यांचा भाजपमध्ये मानसिक छळ केला जात होता. त्यांचा वारंवार अपमान होत असल्याने ते अस्वस्थ होते आणि त्यांनी काँग्रेस नेत्यांसह शरद पवार यांचीही भेट घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि शरद पवार यांनी त्यांना पक्षातच राहण्याचा सल्ला दिला. जर ते काँग्रेसमध्ये आले असते, तर ३ जून २०१४ रोजी दिल्लीत झालेल्या दुर्दैवी रस्ते अपघातात कदाचित त्यांचे प्राण वाचले असते."
पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट काय होता?
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला होता की, गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येण्यास तयार होते आणि त्यांच्यात व काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठकाही झाल्या होत्या.
'इडियट' शब्दावरून भाजप सरकारवर घणाघात
यावेळी संजय राऊत यांनी 'इडियट' शब्दावरून राहुल गांधी यांना बजावण्यात आलेल्या नोटीसवर सडकून टीका केली. राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात आणि देशात सगळे इडियट एकत्र करून सरकार चालवले जात आहे. शोधून शोधून इडियट लोकांना कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री बनवले जाते. हे सर्व 'इडियट कॅबिनेट' आहे." या वक्तव्यावर माझ्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्याचे खुले आव्हानही राऊत यांनी सरकारला दिले.




