उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंची उडवली खिल्ली

उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंची उडवली खिल्ली

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारसह महायुतीवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांचा नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली. "आज हिंदू - मुस्लीममध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे आणि हे काम भाजपने एका 'बेडकाला' दिले आहे," अशी टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, "त्याची उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी आणि आवाज कोंबडीसारखा आहे. डोळे कुणासारखे आहेत, हेही कळत नाही." 

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही नाव न घेता आरोप करत म्हटलं, "बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हिंदुत्वासाठी स्थापन केली, पण आज काहीजण 'शेटजींची पालखी' वाहण्यासाठी शिवसेनेचा वापर करत आहेत." 

भाजपवर टीका करताना त्यांनी सरदार पटेलांचा उल्लेख केला. "ज्यांनी संघावर बंदी आणली, त्यांचाच पुतळा भाजप सरकारने उभा केला. तुमचे हेच हिंदुत्व शिकवणं आमच्यासाठी हास्यास्पद आहे," असे ते म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले, "पाकिस्तानातील कारवायांवर बोलताना तुम्ही म्हणता की सैन्याचे हात बांधले होते, पण ट्रम्पचा फोन आला तेव्हा तुमचाच आवाज बंद झाला. चार अतिरेकी आले तरी सरकार गप्प का? ते गेले कुठे पाताळात, आकाशात की थेट भाजपमध्ये?"

सरकारवर जबाबदारी न घेण्याचा आरोप - 

केंद्र सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करत ठाकरे म्हणाले, "सरकार आल्यापासून देशावर पनवती आली आहे. अपघात, दुर्घटना घडत असताना कुठलाही मंत्री जबाबदारी घेत नाही. देशाला आज खऱ्या अर्थाने पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री हवेत केवळ पक्षाचे प्रतिनिधी नव्हे." "आम्ही इंडिया आघाडी उभी केली तेव्हा आमची तुलना 'इंडियन मुजाहिद्दीन'शी केली गेली. जर आम्ही तसेच आहोत, तर आमचे खासदार जगभर जाऊन न केलेल्या शौर्याचं कौतुक का करत आहेत?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

भाजप मंत्र्यांवरही सोडले टिकास्त्र - 

उद्धव ठाकरे यांनी लष्करातील महिला अधिकारी सोफिया कुरेशी यांच्यावर झालेल्या वादग्रस्त विधानाचा उल्लेख करत भाजप मंत्री विजय शाह यांच्यावरही हल्ला चढवला. "सोफिया कुरेशी यांनी देशाची बाजू ठामपणे मांडली. पण त्या दहशतवाद्याची बहीण असल्याचा आरोप भाजपचा मंत्री करतो अशा नालायक औलादीकडून आपण देश सुधारण्याची अपेक्षा करत आहोत, हीच मोठी शोकांतिका आहे," अशी टीका त्यांनी केली.