मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेत प्रचंड गोंधळ; अभिजित दीपके रस्त्यावर, छत्रपती संभाजीनगरात आंदोलन
छत्रपती संभाजीनगर: बॉंबे हायकोर्टाच्या लिपिक पदासाठी आज (१६ ऑगस्ट) राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. या नियोजनशून्य कारभाराविरोधात परीक्षार्थींमध्ये तीव्र संताप पसरला असून छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांनी थेट परीक्षा केंद्राबाहेर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

नागरिक हक्क संरक्षण मंच (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके यांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. दीपके स्वतः विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर बसल्याने या आंदोलनाला मोठे राजकीय व सामाजिक वलय प्राप्त झाले आहे.
‘आता हेच आमचे जंतर-मंतर!’
परीक्षेतील गोंधळाची माहिती मिळताच अभिजित दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर धाव घेतली. विद्यार्थ्यांच्या व्यथा आणि तांत्रिक अडचणी ऐकून घेतल्यानंतर त्यांनी थेट सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दीपके म्हणाले, "जोपर्यंत ही परीक्षा रद्द करून पुन्हा पारदर्शकपणे आयोजित करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कोणीही जागेवरून उठणार नाही. दिल्लीतील आंदोलनानंतर आता ‘हेच आपले जंतर-मंतर’ आहे."
राज्यभरात आंदोलनाचे आवाहन
काही दिवसांपूर्वीच दिल्ली दौऱ्यावर असताना दीपके यांनी ‘जंतर-मंतर आंदोलन सीझन २’ची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर, संभाजीनगरात सुरू झालेले हे आंदोलन त्याच मालिकेचा भाग मानला जात आहे.
राज्यभरात ज्या-ज्या परीक्षा केंद्रांवर तांत्रिक त्रुटी आणि गोंधळ झाला आहे, तेथील विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेरच ठिय्या मांडून आपला विरोध नोंदवावा, असे आवाहनही दीपके यांनी केले आहे. या अचानक उद्भवलेल्या आंदोलनामुळे प्रशासन हादरले असून आता न्यायालय आणि राज्य सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




