मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित वाद! 22 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या

मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित वाद! 22 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून 22 वर्षीय मयांक लोहार याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान घडली.मयांक लोहार हा विरार पूर्वेकडील भोईरपाडा परिसरात राहत होता आणि अंधेरीतील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. रोजप्रमाणे कामावरून घरी परतत असताना मुसळधार पावसामुळे फर्स्ट क्लास डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून काही प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की एका संतप्त व्यक्तीने आपल्या बॅगेतून चाकू काढत मयांकवर हल्ला केला.

कंबरेत आणि छातीत वार झाल्याने मयांक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हल्ल्यानंतर आरोपी बोरिवली स्थानक येण्यापूर्वीच ट्रेनमधून उतरून फरार झाला.

या घटनेमुळे लोकल प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी सहा विशेष पथके तैनात केली असून तपास वेगाने सुरू आहे. शांत आणि संयमी स्वभावाचा असलेल्या मयांकच्या निधनाने विरार परिसरात शोककळा पसरली आहे.