ओमराजे आता विरोधक नाहीत; 2029 चा निर्णय जनता घेईल" – राणाजगजितसिंह पाटलांची स्पष्ट भूमिका

ओमराजे आता विरोधक नाहीत; 2029 चा निर्णय जनता घेईल" – राणाजगजितसिंह पाटलांची स्पष्ट भूमिका

मुंबई (प्रतिनिधी) : धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असताना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या महायुतीतील प्रवेशावर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पहिली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.माध्यमांशी संवाद साधताना राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, एनडीएमध्ये दाखल झालेल्या सर्व सहा खासदारांचे त्यांनी स्वागत केले असून ओमराजे निंबाळकर आता राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले नाहीत. त्यांनी स्वेच्छेने एनडीएमध्ये प्रवेश केला असल्याने नवीन राजकीय समीकरणांना सुरुवात झाली आहे, असेही ते म्हणाले.

ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या काही वक्तव्यांबाबत सध्या भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. मात्र योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच पद्मसिंह पाटील यांच्या नागरी सत्काराबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या चर्चांना फेटाळून लावत ती माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

2029 च्या निवडणुकीत आपले राजकारण संपवण्याचा इशारा ओमराजेंनी दिल्याच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, "कोण जिंकणार आणि कोण हरणार हे मायबाप जनता ठरवत असते. त्यामुळे अशा वक्तव्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही."दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाबाबत भूमिका मांडल्याबाबत विचारले असता, शिंदे यांना काही शंका असल्यास त्यांनी थेट चर्चा करावी, असे पाटील म्हणाले. तसेच सीबीआयने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय हा अशा प्रकरणांमध्ये सामान्य आणि प्रक्रियात्मक भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ओमराजेंच्या महायुती प्रवेशानंतर धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असताना राणाजगजितसिंह पाटलांच्या या प्रतिक्रियेमुळे आगामी राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.