शिवसेनेत मोठी फूट? डी-लिमिटेशनच्या नावाखाली हुकूमशाहीचा डाव; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

शिवसेनेत मोठी फूट? डी-लिमिटेशनच्या नावाखाली हुकूमशाहीचा डाव; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

कराड येथे माध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून देशात एकाच व्यक्तीची सत्ता मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेच्या काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याने पक्षात फूट पडल्याचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी डी-लिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केंद्र सरकार उत्तर भारतीय राज्यांचे राजकीय वर्चस्व वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधानात बदल करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा त्यांनी केला.

देशातील लोकशाही धोक्यात असून राजकारणावर आर्थिक दबाव आणि तपास यंत्रणांचा प्रभाव वाढत चालल्याची टीका त्यांनी केली. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.याशिवाय मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाच्या उत्सवावर प्रश्न उपस्थित करताना, देशातील वाढती महागाई, रुपयाची घसरण आणि अर्थव्यवस्थेची स्थिती यावर सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.दरम्यान, शिवसेनेतील कथित फूट आणि डी-लिमिटेशनच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.