कोल्हापूर आरटीओमध्ये वाहन पासिंग बंद; शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर आरटीओमध्ये वाहन पासिंग बंद; शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) 1 ऑगस्ट 2026 पासून वाहनांची पासिंग प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. वाहन तपासणीसाठी ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन (ATS) प्रणाली मंजूर करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, ही यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नसून ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत असल्याचा दावा शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेने केला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी म. संजय भोर यांना निवेदन देत, नवीन ATS प्रणाली सुरू होईपर्यंत पूर्वीप्रमाणे मॅन्युअल पद्धतीने वाहन पासिंग प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, पासिंग प्रक्रिया बंद असल्यामुळे नव्याने खरेदी केलेली वाहने रस्त्यावर आणता येत नाहीत. अनेक वाहनधारकांनी फायनान्सवर वाहने घेतली असून हप्ते सुरू आहेत. पासिंग नसल्याने वाहने वापरता येत नाहीत, तसेच रस्त्यावर आढळल्यास दंडात्मक कारवाई होण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत वाहनधारकांना आर्थिक फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, वाहनांचे पासिंग, कर भरणे, कागदपत्रांचे हस्तांतरण आदी अनेक ऑनलाइन सेवा देखील सध्या ठप्प असल्याचा आरोप करण्यात आला आहे. "सिस्टीम अपडेट होत नाही" हे कारण देत वाहनधारकांना वारंवार प्रतीक्षा करावी लागत असून, त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

ATS प्रणाली सुरू होईपर्यंत मॅन्युअल पासिंग सुरू करावे, अन्यथा फ्लाईंग स्कॉडची कारवाईही स्थगित ठेवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच या काळात शासनाच्या महसुलाचे होणारे नुकसान आणि वाहनधारकांना होणाऱ्या आर्थिक तोट्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना जनआंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आवश्यक असल्यास सर्व वाहने आरटीओ कार्यालयात आणून उभी करण्यात येतील, असेही संघटनेने म्हटले आहे.

यावेळी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाचे जिल्हा समन्वयक दिनेश परमार, करवीर तालुका अध्यक्ष दत्ताजी फराकटे, अरुण पाटील, भरत पाटसणे, तुषार जगदाळे, ओमकार फराकटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.