'मी अजूनही एक विद्यार्थीच!'; फ्रेंडशिप डे निमित्त राहुल गांधींची 'Gen-Z' स्टाईल पोस्ट तुफान व्हायरल
दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या आजच्या 'जेन-जी' (Gen-Z) म्हणजेच तरुण पिढीशी कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडियावर वेगळ्या शैलीत ॲक्टिव्ह असलेले पाहायला मिळत आहेत. रविवारी (२ ऑगस्ट) 'फ्रेंडशिप डे'चे औचित्य साधत त्यांनी इन्स्टाग्रामवर अत्यंत खास आणि 'Gen-Z' स्टाईलने तरुणांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर कोरियन 'फिंगर हार्ट' इमोजीचा वापर
इन्स्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर करताना राहुल गांधींनी तरुण पिढीमध्ये लोकप्रिय असलेल्या कोरियन 'फिंगर हार्ट' इमोजीचा वापर केला. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, "मी अजूनही एक विद्यार्थीच आहे आणि रोज नवीन काहीतरी शिकत आहे. मला समजलं की आज 'फ्रेंडशिप डे' आहे आणि हे एक 'हार्ट' असतं. तुम्हा सर्वांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप प्रेम!" राहुल गांधींच्या या अनोख्या आवाहनाने आणि कुल अंदाजाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
'नीट' (NEET) पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची भेट
दुसऱ्या बाजूला, शनिवारी राहुल गांधी यांनी 'नीट' (NEET) पेपर लीक प्रकरणातील गोंधळामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या दुःखी कुटुंबांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहुल गांधी म्हणाले, "आपल्या पोटच्या मुलाला गमावण्यापेक्षा मोठं दुसरं कोणतंही दुःख आई-वडिलांसाठी असू शकत नाही. पेपर लीक होणे, परीक्षा रद्द होणे आणि वर्षांनुवर्षांची मेहनत पाण्यात जाणे, यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेवर अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतात."

विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे अभ्यास करायला सांगितला जातो, परंतु ज्या सिस्टीममध्ये ते दिवस-रात्र मेहनत करत आहेत, ती सिस्टीमच त्यांच्याशी प्रामाणिक नाही, अशा कडक शब्दांत राहुल गांधी यांनी परीक्षा पद्धतीवर निशाणा साधला.




