खामेनी यांच्या मृत्यूनंतर ४ महिन्यांनी ऐतिहासिक अंत्यविधी; अमेरिकेच्या इशाऱ्याला न जुमानता तेहरानमध्ये 'बदला'च्या घोषणा
तेहरान: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण इराणच्या रस्त्यांवर कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसागर उसळला आहे. फेब्रुवारी २०२६ मधील हवाई हल्ल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी होत असलेल्या या ऐतिहासिक अंत्ययात्रेमध्ये केवळ इराणमधूनच नव्हे, तर जगभरातून आलेले लाखो नागरिक सहभागी झाले आहेत. 'अमेरिकेचा नाश असो', 'इस्रायलचा नाश असो' आणि 'बदला' अशा गगनभेदी घोषणांनी तेहरानचे रस्ते दुमदुमून गेले आहेत.

अयातुल्ला खामेनी यांचा अंत्यसंस्कार सोहळा ३ ते ९ जुलै या ७ दिवसांच्या कालावधीत इराण आणि शेजारील इराक अशा दोन्ही देशांमधील प्रमुख धार्मिक स्थळांवर पार पडत आहे. ३ व ४ जुलै रोजी तेहरानमधील 'इमाम खोमेनी ग्रँड मोसल्ला' संकुलात मुख्य प्रार्थना (जनाझा) पार पडली. त्यानंतर ५ जुलै रोजी पार्थिव 'कोम' शहरात नेले जाणार असून, ७ जुलैला इराकमधील नजफ आणि कर्बला या पवित्र शिया स्थळांवरून अंत्ययात्रा काढली जाईल. अखेर ९ जुलै रोजी मशहद येथील अत्यंत पवित्र 'इमाम रेझा दर्गा' परिसरात त्यांचे दफन केले जाईल.
या ऐतिहासिक अंत्यसंस्कारासाठी जगातील १०० हून अधिक देशांचे प्रमुख आणि राजदूत इराणमध्ये दाखल झाले आहेत. भारताच्या वतीने बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पबित्र मार्गेरिटा आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ उपस्थित आहे.
या अभूतपूर्व गर्दीच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) ने घेतली आहे. भाविकांसाठी ५ हजार मशिदी आणि ७०० शाळांचे तात्पुरत्या छावण्यांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या संपूर्ण घडामोडींवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायल बारीक लक्ष ठेवून आहेत. इस्रायलने आपले लष्कर हाय-अलर्टवर ठेवले आहे.
कुटुंबातील इतर सदस्यांवरही अंतिम संस्कार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या हवाई हल्ल्यात अयातुल्ला खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यही मारले गेले होते. यामध्ये त्यांची मुलगी, जावई, सून आणि एका लहान नातीचा समावेश आहे. मुख्य कफनपेटीसोबत या सदस्यांच्या छोट्या कफनपेट्याही संपूर्ण अंत्ययात्रेत सोबत ठेवण्यात आल्या असून, त्यांच्यावरही पूर्ण शासकीय व कौटुंबिक प्रोटोकॉलनुसार अंतिम संस्कार केले जात आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव नवे सर्वोच्च नेते अनुपस्थित! खामेनी यांचे सुपुत्र आणि नवे सर्वोच्च नेते ५६ वर्षीय मोजताबा खामेनी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. ज्या हल्ल्यात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्याच हल्ल्यात तेही गंभीर जखमी झाले होते. इस्रायलकडून त्यांच्या जीवाला अद्याप मोठा धोका असल्याने, केवळ सुरक्षेच्या कारणास्तव ते या ६ दिवसांच्या जाहीर अंत्यसंस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.




