छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर दिग्गजांचे वर्चस्व; २ मंत्री, १ खासदार आणि ५ आमदारांची एन्ट्री!
छत्रपती संभाजीनगर: बहुचर्चित औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC) संचालक मंडळाच्या निवडणुकीचे निकाल अखेर स्पष्ट झाले असून, यंदा बँकेवर जिल्ह्यातील राजकीय दिग्गजांचेच वर्चस्व पाहायला मिळत आहे. २१ सदस्यीय संचालक मंडळावर २ मंत्री, १ खासदार आणि ५ आमदारांची एन्ट्री झाली असून, हे 'हेवीवेट' संचालक मंडळ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
या निवडणुकीत महायुतीच्या 'शेतकरी विकास पॅनल'ने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले होते. एकूण २१ जागांपैकी ८ संचालक आधीच बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये महायुतीचे ७, तर महाविकास आघाडीच्या 'भूमीपुत्र शेतकरी बचाव पॅनल'च्या एका संचालकाचा समावेश होता. उर्वरित १२ जागांसाठी शनिवारी (४ जुलै) ९९ टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते. १०५३ पैकी तब्बल १०४८ मतदारांनी आपला हक्क बजावला होता.
बँकेच्या संचालक मंडळात निवडून आलेले दिग्गज नेते:
- पालकमंत्री संजय शिरसाट (बिनविरोध)
- कॅबिनेट मंत्री अतुल सावे (विजयी)
- खासदार डॉ. कल्याण काळे (विजयी)
- आमदार रमेश बोरनारे (बिनविरोध)
- आमदार विलास भुमरे (बिनविरोध)
- आमदार अंबादास दानवे (विजयी)
- आमदार अनुराधा चव्हाण (विजयी)
- आमदार संजना जाधव (विजयी)
गंगापूर, सोयगाव, कन्नड, छत्रपती संभाजीनगर या चार तालुक्यांतील जागा, बिगर शेती मतदारसंघाच्या ५ जागा, २ महिला आणि १ इतर मागासवर्गीय जागा अशा एकूण १२ जागांसाठी रविवारी सकाळी मतमोजणी झाली. ३१ उमेदवारांचे भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत महायुतीने बाजी मारल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि घोषणाबाजी करत मोठा जल्लोष केला.




