राष्ट्रवादी सोडल्यावर शरद पवार ढुंकूनही पाहत नव्हते, तोच विश्वासघात अहिरांनी आदित्यंसोबत केला

राष्ट्रवादी सोडल्यावर शरद पवार ढुंकूनही पाहत नव्हते, तोच विश्वासघात अहिरांनी आदित्यंसोबत केला

मुंबई: "राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार सचिन अहिर यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते, कारण तो विश्वासघात होता. तोच विश्वासघात आता अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत केला आहे," अशा कडक शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आमदार सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर 'सामना'च्या 'रोखठोक' सदरातून सडकून टीका केली आहे.

राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. "आमदार-खासदार विकत घेणे, पक्ष फोडणे आणि नंतर पत्रकार परिषदेत विकृत हसणे याचे व्यसन या नेत्यांना जडले आहे. या राजकारण्यांना नशामुक्ती केंद्रात भरती करणे ही भारतीय लोकशाही आणि संविधानाची गरज बनली आहे. दिल्लीचे नेते या दरोड्याचे खरे सूत्रधार असून, महाराष्ट्र बुडवण्याचे काम सुरू आहे," असा आरोप त्यांनी केला.

सचिन अहिर यांच्यावर निशाणा साधताना राऊत म्हणाले, "अहिर जेव्हा राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आले, तेव्हा शरद पवारांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता मी पाहिली होती. पवारांनी त्यांना मानप्रतिष्ठा, सत्ता सगळं दिलं होतं. पुढे वरळीत त्यांचा पराभव झाल्यावर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम लागला होता, मात्र शिवसेनेने त्यांना आमदार करून जीवदान दिले. आता तेच अहिर ठाकऱ्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत."

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे नासवायला निघाले असून, हे सरकार बेइमानांच्या पाठीशी ठाम उभे आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

फुटीर खासदारांना सुरक्षा कशासाठी?
 "जे खासदार फुटले त्यांनी असे कोणते राष्ट्रीय सुरक्षेचे कार्य केले की त्यांना सशस्त्र पोलीस गाड्यांची सुरक्षा दिली जात आहे?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. हे खासदार शिवसेनेत असताना फडणवीस त्यांना निधीचा दमडाही देत नव्हते, मात्र ते शिंदेंकडे जाताच त्यांना स्वतःच्या चेंबरमध्ये बोलवून सन्मानाने निधी दिला जात आहे. हे बेइमानीला उघड उत्तेजन असल्याचा टोला त्यांनी लगावला.