देवेंद्र फडणवीस तुमच्यात चांगदेवाचा अहंकार भरलाय; सुषमा अंधारेंची टीका

देवेंद्र फडणवीस तुमच्यात चांगदेवाचा अहंकार भरलाय; सुषमा अंधारेंची टीका

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांमुळेच हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही, असा आरोप त्यांनी केला. तसेच, राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षातील त्यांच्या तोडीचा कोणताही नेता या विषयावर चर्चा करण्यास तयार असेल, तर आपण खुल्या चर्चेसाठी सज्ज असल्याचे आव्हानही फडणवीस यांनी दिले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केलीय. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये ट्विट केलं होतं, त्या ट्विटचा अर्थ काय घ्यायचा? त्यात त्यांनी ऐतिहासिक क्षण असं लिहिलं होतं, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट वाचून दाखवलं. हे काय होतं हे फडणवीस यांनी समजावून सांगावं.  जर आता तुम्ही म्हणत असाल की विरोधकांमुळे विधेयक पडलं तर या ट्विटचा अर्थ काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

तुम्ही काल खूप आव्हाने दिली. तुम्हाला माझे आव्हान आहे की, महात्मा फुले यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचं वाचन तुम्ही RSS च्या वार्षिक कार्यक्रमात करणार का? गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड, हे फडणवीस यांनी वाचून दाखवावं. किमान या पुस्तकावर मोहन भागवत यांची काय प्रतिक्रिया आहे? ते तरी विचारावं. साऊथ विरुद्ध नॉर्थ हा संघर्ष भाजप करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना रंग बदलणारा सरडा, असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नाही. फडणवीस साहेब तुमचा स्तर नेमका कोणता आहे हे आधी मला सांगा. तुम्ही हा स्तर कसा ठरवला? देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांचा अवमान केला. तुम्ही या दोघींच्या उत्तरांना नाकारता म्हणजे तुम्ही महिलांना कमी लेखतात. तुम्ही महिलांना तुच्छ समजतात. तुम्ही स्तराची भाषा केली.  देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगदेवाचा अहंकार भरला आहे, अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली. 

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही चर्चेला बोलवा. आम्ही तयार आहोत. जर तुम्ही चर्चा नाही केली तर तुम्ही सत्याला सामोरे जायला घाबरतात, असं होईल. वेळ, दिवस तुम्ही ठरवा, आम्ही येऊ. तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आम्ही देऊ. मी एकटी यायला देखील तयार आहे, असा म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं.