दुष्काळ जाहीर करा, विकासकामे थांबवून तो निधी शेतकऱ्यांसाठी वापरा; रोहित पवारांची सरकारकडे आक्रमक मागणी

दुष्काळ जाहीर करा, विकासकामे थांबवून तो निधी शेतकऱ्यांसाठी वापरा; रोहित पवारांची सरकारकडे आक्रमक मागणी

लातूर: राज्यातील बहुतांश भागात पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. "खरिपात ७५ टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याने रब्बी हंगामाचीही आशा मावळली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शक्तीपीठ महामार्गासारख्या विकासकामांचा निधी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जगवण्यासाठी वळवावा," अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

 

 धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील पाहणीनंतर लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे पोहोचलेल्या रोहित पवार यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. प्रशासनाकडून पंचनामे व कोणतीही मदत मिळत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी बोलून दाखवली.

 शेतकऱ्यांना पुढील १० महिने जगवण्याचे आव्हान
शेतकऱ्यांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, "खरिपातील ७५ टक्के पिके वाया गेल्याने जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुढील १० महिने सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसे जगवायचे, हा मोठा प्रश्न आहे. यासाठी सरकारने नियम व अटींमध्ये न अडकता तात्काळ मदत जाहीर करावी."

 

महायुती सरकारवर जोरदार निशाणा
सरकारच्या कारभारावर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, "शरद पवार यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. १० दिवसांत मार्ग निघाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा आमचा इतिहास आहे. आज अजित पवार असते तर नियम आणि अटींमध्ये न अडकता जनतेच्या प्रश्नांवर काम केले असते. मात्र सध्याच्या महायुतीतील नेत्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे उरलेले नसून, त्यांना फक्त पक्ष आणि लोकप्रतिनिधी फोडण्यातच रस आहे."