भारत जगातील तिसरी सर्वात मोठी 'स्टार्टअप इकोसिस्टिम; फ्रान्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे वक्तव्य
मुंबई (प्रतिनिधी): गेल्या १२ वर्षांत भारताने एक मजबूत इनोव्हेशन सिस्टीम तयार केली आहे. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी 'स्टार्टअप इकोसिस्टिम' बनला आहे. २१ व्या शतकात भारत वेगाने बदलत असून माहिती क्रांतीच्या जोरावर देश आता स्टार्टअप क्रांतीकडे वाटचाल करत आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

फ्रान्समधील नीस शहरात आयोजित 'भारत इनोव्हेट्स २०२६' (Bharat Innovates 2026) या भव्य कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांनी मिळून या ३ दिवसीय कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले.
कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "नवोपक्रम हा भारताच्या डीएनएमध्येच आहे. मानवतेच्या कल्याणासाठी आणि लोकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे ही भारताची प्राथमिकता आहे. AI क्षेत्रात भारताकडे मोठ्या संधी आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे."
पंतप्रधानांनी देशात सुरू असलेल्या आर्थिक आणि धोरणात्मक सुधारणांचा उल्लेख करत स्पष्ट केले की, एकविसाव्या शतकात भारत वेगाने बदलत आहे. माहिती क्रांतीच्या बळावर देश आता स्टार्टअप क्रांतीकडे वाटचाल करत आहे. आमची रिफॉर्म एक्सप्रेस आता थांबणार नाही. सुधारणांचा हा वेग असाच पुढे सुरू राहील, ज्यामुळे स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनला आणखी बळ मिळेल.




