जे भल्याभल्यांना जमलं नाही, ते डी. वाय. पाटलांनी करून दाखवलं ; डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी वाहिली श्रद्धांजली

जे भल्याभल्यांना जमलं नाही, ते डी. वाय. पाटलांनी करून दाखवलं ; डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी वाहिली  श्रद्धांजली

कोल्हापूर (प्रतिनिधी): ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. यमकनमर्डी येथील हरीकाका गोसावी भागवत मठाचे पीठाधीश डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या जीवनकार्याचा गौरव करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

"प्रपंच आणि परमार्थ दोन्ही लीलया सांभाळले"
पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. आनंद महाराज गोसावी म्हणाले की, "आज आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आणि श्रद्धास्थान असणारे डॉ. डी. वाय. पाटील साहेब वैकुंठवासी झाले आहेत. 'प्रपंच करावा नेटका, परमार्थ साधावा विवेका' या उक्तीप्रमाणे, जे भल्याभल्यांना जमले नाही ते डी. वाय. पाटील साहेबांनी अत्यंत उत्तम रीतीने करून दाखवले. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी त्यांनी लीलया सांभाळल्या."

गुरुनिष्ठा आणि मार्गदर्शनाचा आदर्श
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, "डी. वाय. पाटील साहेबांनी त्यांच्या आयुष्यात दाखवलेली अढळ गुरुनिष्ठा ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत विशेष आणि वंदनीय आहे. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर आणि दाखवलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांच्यासाठी खरी आणि मोठी आदरांजली ठरेल."

डी. वाय. पाटील साहेबांच्या पवित्र आत्म्यास ईश्वरचरणी निरंतर शांती लाभो, अशी प्रार्थना करत डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी मठाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.