'मिशन अंकुर', जिल्हा परिषद कोल्हापूरच्या शिक्षण विभागाचा यशस्वी नवोपक्रम
कोल्हापूर (प्रतिनिधी) - नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार इयत्ता तिसरी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत वाचन, लेखन आणि अंकगणिताच्या क्षमता प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने निपुण भारत अभियानाची सुरुवात केलेली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व प्राथमिक शाळांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने 'मिशन अंकुर आरंभिक साक्षरता संवर्धन कार्यक्रम' हा नवोपक्रम २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षात राबवण्यात आला. शाळा, केंद्र, तालुका या पातळ्यांवर हा उपक्रम लोकसहभागातून यशस्वीपणे राबवण्यात आल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या १९५७ प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 'मिशन अंकुर' हा उपक्रम राबवण्यात आला. इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गाना शिकवणाऱ्या शिक्षकांची जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळांमध्ये उपक्रमपूर्व अध्ययन-अध्यापन, प्रश्नपत्रिकांची रचना व स्वरूप आणि मूल्यमापन याविषयी माहिती देण्यात आली. लिखित स्वरूपात घटक संच (Module) विकसित करून ते शिक्षकांना पुरविण्यात आले.
एप्रिल २०२५ मध्ये सकाळी ९ ते ११ या वेळेत 'मिशन अंकुर' या उपक्रमाची तालुकास्तरीय अंमलबजावणी पार पडली. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांनी १०० गुणांची परीक्षा दिली. सदर परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित असून प्रश्नपत्रिकेत बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश केला आहे.
सदर परीक्षेसाठी केंद्र बदलून पर्यवेक्षक, परीक्षक व केंद्रसंचालक यांची नेमणूक करण्यात आली. परीक्षा कामकाजादिवशीच परीक्षा केंद्रावर नियुक्त शिक्षकांमार्फत निकाल तयार करण्यात आला.
मुलांमध्ये गुणांची स्पर्धा निर्माण न होता शिक्षकांमध्ये पूर्ण वर्गाच्या गुणवत्तेची स्पर्धा निर्माण व्हावी, यासाठी श्रेणीवर आधारित मूल्यमापन प्रक्रिया राबविली गेली. संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची सरासरी (CWSN विद्यार्थी वगळून) विचारात घेऊन वर्गाची व वर्ग शिक्षकांची रैंक (क्रमवारी) निश्चित करण्यात आली.
सर्व तालुक्यातील एकूण सरासरी गुणांनुसार तालुक्यांची रैंक निश्चित करण्यात आलेली आहे. सोबत तालुकानिहाय 'मिशन अंकुर प्रारंभिक साक्षरता संवर्धन कार्यक्रम' अंतिम परीक्षा निकाल गोषवारा जोडलेला आहे.
मिशन अंकुर उपक्रमाचे फलित -
इयत्ता पहिली आणि दुसरीमधील विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्ती हे निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपक्रम पूरक ठरला आहे.
शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन त्याचा उपयोग विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी पोषक ठरला आहे अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे.
शिक्षकांमध्ये वर्गाच्या गुणवत्तेप्रती जबाबदारी आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण झाली आहे.




