सावर्डे दुमाला येथील सहलीवर गेलेल्या विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी अंत
करवीर (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील आरे-वारे बीच येथे सहलीवर गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. समुद्रात उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी अतुल रघुनाथ सुतार (वय १७) याचा बुडून मृत्यू झाला. तर मयूर विष्णू खाडे (वय १६) याला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे सावर्डे दुमाला गावावर शोककळा पसरली आहे.
खाजगी शिकवणी वर्गामार्फत सावर्डे दुमाला, सडोली दुमाला, हिरवडे दुमाला गावातील नुकतीच दहावी पास झालेले तब्बल ४१ विद्यार्थी सहलीसाठी आरे-वारे बीच येथे गेले होते. यामध्ये १७ -१९ विद्यार्थिनींचा समावेश आहे. दुपारच्या वेळी अंघोळीसाठी विद्यार्थी समुद्रात उतरले असता ही दुर्दैवी घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच अतुलच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेची वार्ता गावात पोहोचताच भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सहलीला गेलेल्या ४१ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी फोन करून आपल्या पाल्यांची विचारपूस सुरू केली. विद्यार्थीदेखील भीतीच्या छायेतून आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधत होते.
मयत अतुल हा अत्यंत गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थी होता. त्याचे वडील सुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अतुलच्या पश्चात आई-वडील, लहान बहीण, आजोबा, चुलता व चुलती असा परिवार आहे. त्याच्या अकाली निधनामुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत असून सुतार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या दुर्दैवी घटनेमुळे सावर्डे दुमाला गावात शोकमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.




