२ वर्षे तक्रार करूनही पालिका ढिम्म ! रायगड कॉलनीतील शाळेत साचलं गुडघाभर पाणी
कोल्हापूर/ प्रतिनिधी : "आम्ही गेल्या २ वर्षांपासून शाळा आणि नगरसेवकांना सांगतोय, पण कोणीही दखल घेत नाही. पावसात आमच्या मुलांना शाळेत पाठवणे म्हणजे त्यांना संकटात ढकलण्यासारखे आहे!" ही संतप्त आणि हताश प्रतिक्रिया आहे कोल्हापुरातील एका पालकाची. कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील कै. विठाबाई पाटील विद्यालय, रायगड कॉलनी परिसराची पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शाळेच्या आवारात आणि समोरील रस्त्यावर गटार नसल्याने पावसाचे पाणी साचून राहते. त्यामुळे लहान मुलांना चिखल तुडवत आणि गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे.

गेल्या २ वर्षांपासून शाळा प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांकडे वारंवार तक्रार करूनही यावर कोणतीही उपाययोजना झाली नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यात शाळेच्या आवाराला एखाद्या जलमय तलावाचे स्वरूप येते. लहान मुले रेनकोट आणि छत्र्या घेऊन पाण्यातून कसरत करत जात असल्याचे चित्र समोर आले आहे. या साचलेल्या घाण पाण्यामुळे विद्यार्थ्यांना पडून जखमी होण्याचा धोका तर आहेच, शिवाय डेंग्यू आणि मलेरियासारखे गंभीर आजार पसरण्याची शक्यता देखील दिवसेंदिवस वाढत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ पाण्याचा निचरा करण्याची आणि कायमस्वरूपी गटार बांधण्याची मागणी केली आहे. तसेच, येत्या १५ दिवसांत यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालयात धाव घेण्याचा कडक इशाराही त्यांनी दिला आहे. आता या गंभीर परिस्थितीनंतर तरी कोल्हापूर महापालिका आणि लोकप्रतिनिधींना जाग येणार का आणि या चिमुकल्या विद्यार्थ्यांची चिखलातून सुटका होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




