राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली 'ही' घोषणा
कागल (प्रतिनिधी) - शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे शाहू ग्रुपमधील सर्वच संस्था आपल्या कार्याने आदर्श ठरत आहेत. त्यामुळेच बाजारात ‘शाहू’ हा विश्वासार्ह ब्रँड घडला आहे.आता त्याच ब्रँडखाली दर्जेदार पशुखाद्य निर्मिती करणार असल्याची घोषणा शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली. श्री छत्रपती शाहू कृषी सहकारी खरेदी-विक्री सोसायटीच्या ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष अनंत फर्नांडिस होते.

राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, “स्व.राजेसाहेब यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार खतं व कृषी निविष्ठा रास्त दरात वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी ही सोसायटी स्थापन केली.त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.गतवर्षी प्रतिकूल परिस्थितीतही शाहू कृषी संघाच्या बावीस शाखांतून शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे रासायनिक खते व इतर निविष्ठा पुरविण्यात आल्या.यावर्षीही हा पुरवठा सुरळीत सुरू राहील.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास व स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जनरल मॅनेजर सदानंद घोरपडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी सर्व विषय आवाजी मतांनी मंजूर केले. उपाध्यक्ष अरुण शिंत्रे यांनी स्वागत केले तर संचालक दिनकर वाडकर यांनी आभार मानले.
यावेळी राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे, शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.




