केआयटी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘आयडियाथॉन’ ची सांगता

केआयटी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘आयडियाथॉन’ ची सांगता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने आयडियाथॉन-२५ या इनोव्हेशन व उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली. नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी त्यांच्यामध्ये प्रश्न सोडवण्याची वृत्ती मूळ धरावी, इनोव्हेशन्स आणि स्टार्टअपला पोषक वातावरण त्यांना मिळावे या हेतूने अशा स्पर्धेची योजना करण्यात आली. नाविन्यपूर्ण कल्पना शोधणे,त्यातून निवडलेल्या नवीन नवीन कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्याच्या हेतूने एक सक्षम लॉन्च पॅड त्यांना उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

 देशभरातील १०० संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, अभियांत्रिकी विज्ञान क्षेत्रातील संशोधक,उद्योजक यांनी उत्साह पूर्वक सहभाग नोंदवला. अत्यंत सृजनशील पद्धतीने सादर केलेल्या सर्व कल्पना या खरच विकसित भारताच्या वाटचालीच्या द्योतक होत्या. केआयटी च्या वतीने नवोउद्योजकांना शेती तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान, शिक्षण तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, आयओटी बेस्ड तंत्रज्ञान, मशीन लर्निंग आधी विविध विषयातील उत्तम संशोधन,स्टार्ट अप आयडीया या स्पर्धेसाठी अपेक्षित होत्या. या आयडियाथॉन २०२५ साठी एकूण ३५० पेक्षा अधिक नाविन्यपूर्ण कल्पना प्राप्त झाल्या. त्यातील २३१ कल्पनांना दुसऱ्या फेरीसाठी निवडले गेले व या दुसऱ्या फेरीतून अंतिम फेरीसाठी फक्त ७१ कल्पना या निवडण्यात आल्या.

 यावेळी सुधीर आरळी, मुख्य कार्यकारी अधिकारी केआयटी आयआरएफ यांनी केआयटीच्या आज पर्यंतच्या कामांची व महत्त्वाच्या टप्प्यांची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. डॉ. मोहन वनरोट्टी, मुख्य अन्वेषक DST NIDHI i-TBI & MSInS यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण व्हावी, नवकल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक सकस व सुदृढ वातावरण निर्माण करून देण्यामध्ये केआयटी आयआरएफ सकारात्मक व यशस्वी प्रयत्न करत असल्याबाबत त्यांनी सांगितले.केआयटीच्या आयडिया लॅब मधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना प्रोटोटाईप स्वरूपामध्ये आणण्यासाठी संशोधक तरुणाईने व नवउद्योकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संजय रानडे रचना इलेक्ट्रिकल अँड रेफ्रिजरेशन्स सांगली, डॉ. शाम आडेपल्ली प्राध्यापक मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट यांची विशेष उपस्थिती होती. 

 या उपक्रमाचे आयोजन केआयटी आयआरएफ यांनी केले असून त्यांना महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, महाराष्ट्र राज्य तसेच, केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, निधी आय-टीबीआय चे सहकार्य लाभले. डी-बाटू फोरम ऑफ इनोव्हेशन अँड इंक्युबॅशन अँड एंटरप्राइज, लोणेरे व उद्यम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ फाउंडेशन इंक्युबॅशन सेंटर सोलापूर यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर पुनस्कर, इंक्युबेशन मॅनेजर यांनी केले. ज्यामध्ये त्यांनी कार्यक्रमाचा हेतू,स्पर्धेचे नियम व अटी यांची सविस्तर माहिती दिली. स्पर्धकांकडून काय अपेक्षित आहे याची सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी या प्रास्ताविकात दिली.त्यानंतर विविध क्षेत्रातील आठ तज्ञ परीक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व परिचय करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली , उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले, यांनी आयडियाथॉन-२५ च्या यशस्वी नियोजन बद्दल केआयटी आयआरएफ च्या टीमचे अभिनंदन केले व प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश दुधगावकर इंक्युबेशन असोसिएट यांनी केले. पार्थ हजारे व संदीप लाड यांनी या स्पर्धेची तांत्रिक बाजू यशस्वीरित्या सांभाळली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन देवेंद्र पाठक, इंक्युबेशन मॅनेजर यांनी केले.