राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर फडणवीसांचा निशाणा; ‘काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील मुलींनाच प्रवेश’
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयांमधील मुलींचीच नोंदणी करून त्यांना कार्यक्रमस्थळी आणले जाणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. ते गुरुवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राहुल गांधी यांचा विद्यार्थ्यांशी संवादाचा हा कार्यक्रम खुला असता तर त्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले असते, असे फडणवीस म्हणाले. “राहुल गांधींनी सर्वसामान्य तरुणांशी संवाद साधला असता तर आनंद झाला असता. मात्र, माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेत्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या महाविद्यालयांमधील मुलींचीच नोंदणी करून त्यांना कार्यक्रमासाठी आणण्याच्या सूचना आहेत,” असा दावा त्यांनी केला.
फडणवीस यांनी पुढे म्हटले की, कार्यक्रमाला येणारे विद्यार्थीही आपलेच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद झाला तरी आनंद आहे. मात्र, हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांशी संवाद साधणारा ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘वंदे मातरम’वरून काँग्रेसवर टीका
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताबाबत काँग्रेसने मंजूर केलेल्या ठरावावरूनही टीका केली. स्वतंत्र भारताच्या संसदेनं घेतलेला निर्णय मान्य न करण्याची भूमिका काँग्रेस घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“काँग्रेसने मंजूर केलेला ठराव संविधानविरोधी आहे. आता भारतात ब्रिटिशांचं राज्य नाही. स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला निर्णय संवैधानिक असतो. तो निर्णय आम्ही मान्य करणार नाही, अशी भूमिका घेतली जात असेल तर त्यातून काँग्रेसची मानसिकता स्पष्ट होते,” असे फडणवीस म्हणाले.
लाडकी बहीण योजनेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांच्या पडताळणीबाबतही फडणवीस यांनी माहिती दिली. योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर तपासणी करणे शक्य नव्हते. त्यानंतर ई-केवायसीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 1 कोटी 65 लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून त्या पात्र ठरल्या आहेत. काही महिलांनी ई-केवायसी केलेले नाही. तसेच आयकर भरणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईचा इशारा
लाडकी बहीण योजनेचा लाभ नियमबाह्य पद्धतीने घेतलेल्या व्यक्तींवर सरकारकडून कारवाई केली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच काही सरकारी कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“आता समोर आलेला लाभार्थ्यांचा आकडा 100 टक्के व्हेरिफाईड आहे. पात्र महिलांना आमचं सरकार असेपर्यंत या योजनेचा लाभ मिळत राहील,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.




