स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे - राज्यात सध्या महायुतीचे सरकार असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षाच्या शिलेदारांना स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. "प्रभाग रचना जाहीर झाली आहे. काही हरकतींनंतर थोडेफार बदल होतील, पण आपली तयारी ही स्वबळावर लढण्याचीच असावी," असंही ते म्हणाले.
पुणे महापालिकेत भाजपकडून राष्ट्रवादीला सोबत घेण्याची कोणतीही तयारी दिसत नसल्याचं चित्र आहे. शिवाय, सध्याची प्रभाग रचना ही भाजपच्या सोयीची असल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षातील माजी नगरसेवकांची बैठक बोलावून, निवडणुकीच्या रणनीतीबाबत दिशा दिली.




