नारायण राणेंकडून संजय राऊतांना तडजोडीचा प्रस्ताव? माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील मानहानी प्रकरणाची सुनावणी माझगाव कोर्टात झाली. आजच्या सुनावणीत नारायण राणे यांच्या बाजूने संजय राऊत यांच्यासमोर तडजोडीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यावर राऊत यांनी कोर्टाकडे वेळ मागितला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.

या प्रकरणात नारायण राणे यांचे वकील ज्येष्ठ विधीज्ञ सतीश मानेशिंदे यांना आज संजय राऊत यांची उलटतपासणी घ्यायची होती. मात्र, त्याआधीच राणे यांच्या बाजूने सेटलमेंटबाबत विचारणा करण्यात आली. संजय राऊत यांना अद्याप अधिकृत प्रस्ताव मिळालेला नसून, प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल, अशी भूमिका त्यांच्या वकिलांनी कोर्टात मांडली.
संजय राऊत यांचे वकील सार्थक शेट्टी यांनी सांगितले की, “संजय राऊत यांनी नारायण राणेंविरोधात मानहानीची केस दाखल केली आहे. केस जवळपास पूर्ण झाली आहे. आज राणे यांच्या वकिलांकडून क्रॉस करायचे होते. मात्र, कोर्टासमोर सेटलमेंटसाठी विचारणा करण्यात आली. राऊत यांनी अद्याप आम्हाला ऑफर आलेली नाही, ऑफर आल्यास आम्ही विचार करू, असे सांगितले. त्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत वेळ मागण्यात आला आहे.”
जानेवारी 2023 मध्ये भांडुप येथील अटल बिहारी वाजपेयी मैदानावर आयोजित कोकण फेस्टिव्हलमध्ये नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्या खासदारकीबाबत वक्तव्य केले होते. राणे यांनी आपण संजय राऊत यांना खासदार करण्यासाठी मदत केली होती, असा दावा केला होता.
संजय राऊत यांचे नाव मतदार यादीत नव्हते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता, मात्र आपण मध्यस्थी करून त्यांना निवडून आणले, असा दावाही राणे यांनी केला होता. तसेच राऊत यांना खासदार करण्यासाठी पैसे खर्च केल्याचे विधान त्यांनी केले होते.या वक्तव्यांमुळे आपली बदनामी झाल्याचा दावा करत संजय राऊत यांनी नारायण राणेंविरोधात मानहानीचा दावा दाखल केला.
कोर्टात साक्ष नोंदवताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांनी केलेले आरोप गंभीर असल्याचे म्हटले. आपल्या राज्यसभा उमेदवारीवर आणि निवडून येण्यावर प्रश्न उपस्थित करणे ही केवळ वैयक्तिक बदनामी नसून निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी वक्तव्ये असल्याचे राऊत यांनी सांगितले.राज्यसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असताना आपण पैसे खर्च करून खासदार झाल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.आता 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत दोन्ही बाजूंची भूमिका काय राहते आणि तडजोडीच्या प्रस्तावावर संजय राऊत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.




