सहा मित्रांची वीस वर्षांनंतरची कोकण भेट एकासाठी ठरली अखेरची

सहा मित्रांची वीस वर्षांनंतरची कोकण भेट एकासाठी ठरली अखेरची

रायगड - कोकणातील रेवदंडा येथे वीस ते पंचवीस वर्षांनंतर एकत्र जमलेल्या सहा व्यावसायिक मित्रांच्या आनंदसोहळ्याचा दुर्दैवी शेवट झाला. प्रभादेवी, मुंबई येथील 71 वर्षीय आनंद अय्यर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अहमदाबाद आणि मुंबईमधील सहा मित्रांनी दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे गेट-टुगेदरचे आयोजन केले होते. सर्व जण एका हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र शुक्रवारी दुपारी अचानक आनंद अय्यर यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर परिस्थिती गंभीर बनली. मित्रांनी आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना रिक्षातून शिंदे हॉस्पिटलकडे रवाना केले.

दरम्यान, शेतकरी भवनाजवळ पोहोचताच रिक्षाचा टायर फुटला आणि गोंधळ उडाला. त्याच वेळी रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल योगायोगाने तेथून जात होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ मदत केली, दुसरी रिक्षा बोलावून अय्यर यांना जिल्हा रुग्णालयाकडे रवाना केले. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

अहमदाबादहून आलेल्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्यर यांना पूर्वी सौम्य हृदयविकाराचा त्रास होता. अचानक आलेल्या झटक्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली आणि उपचार सुरू होण्याआधीच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांचा मुलगा मुंबईहून येत असून त्याच्या उपस्थितीत पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. अनपेक्षित मृत्यूमुळे सर्व सहकारी शोकाकुल झाले असून, दोन दशकांनंतर झालेला हा आनंदाचा मेळावा एका हृदयद्रावक प्रसंगाने विरून गेला.