निरोगी शरीर हीच खरी संपत्ती, नागरिकांनी आरोग्याबाबत दक्षता घ्यावी: अरुंधती महाडिक

निरोगी शरीर हीच खरी संपत्ती, नागरिकांनी आरोग्याबाबत दक्षता घ्यावी: अरुंधती महाडिक

कोल्हापूर/प्रतिनिधी :

"आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. अवेळी जेवण, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे विविध व्याधी जडत आहेत. मात्र, निरोगी आणि व्याधीमुक्त शरीर हीच माणसाची खरी संपत्ती आहे. नागरिकांनी अशा आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून स्वतःची तपासणी करून वेळीच आरोग्याबाबत दक्षता घ्यावी," असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी केले.

'राष्ट्रीय डॉक्टर्स डे'चे औचित्य साधून कोल्हापुरातील रामानंदनगर येथील बालाजी पार्क येथे भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीने भव्य मोफत वैद्यकीय व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. 'गोपालकर क्लिनिक'च्या सहकार्याने आयोजित या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि मोफत उपचार
या शिबिरात गोपालकर क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची सखोल वैद्यकीय तपासणी करून त्यांना योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन आणि सल्ला दिला. तसेच, दंततज्ज्ञ (डेंटिस्ट) डॉ. निकीता कापसे यांनी नागरिकांच्या मौखिक आरोग्याची आणि दातांची तपासणी करून गरजेनुसार जागीच उपचारही केले.

अरुंधती महाडिक यांनी आयोजनामागचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, "नोकरी किंवा व्यवसायामुळे अनेकांना आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. व्याधी झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा, आजार होऊच नये यासाठी आधीच काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या प्रकृतीसाठी वेळ काढला पाहिजे."

यावेळी  नगरसेवक विजयसिंह खाडे, युवराज माने, गर्जना आखाड्याचे अध्यक्ष नाना सावंत, डॉ. विजयकुमार गोपालकर, डॉ. तिलोत्तमा गोपालकर, डॉ. सुप्रिया गोपालकर, डॉ. सुनिती गोपालकर, डॉ. सोहम गोपालकर, डॉ. शुभम पाटील आणि डेंटिस्ट डॉ. निकीता कापसे तसेच बालाजी हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी तुपारे, सचिव राजाराम निकम, खाटिक समाजाच्या अध्यक्षा सुनीता घोडके तसेच भागीरथी संस्थेच्या स्वयंसेविका स्नेहल खाडे, राधा मेस्त्री, ऐश्वर्या देसाई, मीना पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.