चारचाकीतून बहिणीला आणण्यासाठी निघालेल्या भावावर काळाचा घाला
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथून आपल्या बहिणीला आणण्यासाठी निघालेल्या एका तरूणाच्या चारचाकीचा आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात तरूणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. हा अपघात १४ नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास नगर - मनमाड महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील भास्कर वस्तीजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीवरून इंदोरच्या दिशेने जाणारी खाजगी बस आणि समोरून येत असलेली चारचाकी यांच्यात जोरदार समोरासमोरची धडक झाली. धडकेनंतर चारचाकीने अचानक पेट घेतला आणि काही क्षणांतच ती आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या भीषण आगीत चारचाकी चालक मुजाहिद पप्पू शेख (वय अंदाजे 30, रा. विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) जागीच होरपळून मृत्युमुखी पडला. धडकेनंतर बसचा पुढील भाग चक्काचूर झाला असून बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघात होताच प्रसंगावधान राखत प्रवाशांनी बसमधून तातडीने बाहेर पडून जीव वाचवला.
घटनास्थळी कोपरगाव नगरपालिकेचे तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अग्निशमन पथक तातडीने दाखल झाले आणि संयुक्तरीत्या कारवरील आग विझवण्यात यश मिळवले. स्थानिक नागरिकांनीही प्रवाशांना मदत केली. मात्र कारला लागलेल्या भीषण आगीमुळे ती सीएनजी वाहन आहे का, या चर्चेमुळे कोणीही पुढे जाण्यास धजावले नाही.
अपघातानंतर नगर - मनमाड महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर केले. जवळपास अर्धा तास कार जळत असल्याने चालकाचा मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाला असल्याचे समजते. पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहेत. बसमधील जखमी प्रवाशांवर कोपरगावमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




