ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; CBI चा धक्कादायक खुलासा
मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शनच्या तपासाला आणखी वेग आला असून, आरसीसी खाजगी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर,नीट पेपरफुटी प्रकरणातील महत्वाचे दस्ताऐवज समोर आले असून असून सीबीआयने आरोपींच्या संदर्भात दाखल केलेली कागदपत्रे माझाच्या हाती आली आहेत. पुण्यातील आरोपी मनिषा वाघमारे यांचा या गुन्हात सक्रीय सहभाग असल्याच सीबीआयच्या तपासात स्पष्ट झालं असून पेपर फोडणाऱ्या टोळीतील सक्रिय सदस्या मनीषा वाघमारेच असल्याचा उल्लेख सीबीआयच्या कागदपत्रात आहे. त्यानुसार, 27 एप्रिल रोजीच मनीषा वाघमारेनेही शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घेत प्रश्नपत्रिका मिळवली होती. सीबीआयच्या तपासात अनेक खुलासे मनीषा वाघमारेने केले आहेत.

पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर मनीषा वाघमारे आता सीबीआय कोठडीत असून सीबीआयच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. मनीषा वाघमारेनी इतर आरोपींशी संगनमत करून नीट युजी परिक्षेचे पेपर, शासकीय कर्मचाऱ्यांसोबत गुन्हेगारी कट रचून प्रश्नपत्रिका आणि उत्तरेही परीक्षेपूर्वीच 27 एप्रिल 2026 रोजी मिळवली होती. मनीषा वाघमारेने मित्र धनंजय लोखंडे याच्या माध्यमातून नाशिकमध्ये समुपदेशनाचा व्यवसाय करणाऱ्या शुभम खैरनार याच्याशी संपर्क साधला व त्याला पेपर पुरवले. कारवाई होऊ नये यासाठी मनिषा वाघमारेने सर्व पुरावे नष्ट केले, त्यामुळे पुढील तपासात सीबीआयला व्यत्यय आला. 3 मे रोजी नीटची परीक्षा झाली होती, म्हणजेच 8 दिवस अगोदर मनीषाने प्रश्नपत्रिका मिळवली होती. दरम्यान, मनिषा वाघमारेच्या घराची पोलिसांनी 13 मे रात्री 8.30 वाजल्यापासून ते 14 मे रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत झाडाझडती घेतली होती, मनीषा वाघमारे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
NEET UG परीक्षा 2026 चा पेपर फोडण्यात आणि त्याचे बाजारात वाटप करणाऱ्या एका मोठ्या संघटित टोळीच्या सक्रिय सदस्य असल्याचा आरोप मनीषा वाघमारेवर आहे. गुन्हेगारी कट रचणे, संबंधित असलेल्या काही शासकीय/सार्वजनिक सेवकांसोबत मिळून परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर मिळवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. परीक्षेपूर्वीच पेपर मिळवणे- तपासातील माहितीनुसार, त्यांनी परीक्षेच्या बरेच आधी, म्हणजेच दिनांक 27 एप्रिल 2026 रोजीच NEET UG परीक्षेचे प्रश्नपत्र आणि उत्तरपत्रिका मिळवली होती. पैशांच्या मोबदल्यात पेपर विकणे- त्यांनी लीक झालेला प्रश्नपेपर आणि उत्तरपत्रिका 'धनंजय' नावाच्या व्यक्तीसह इतर अनेक विद्यार्थ्यांना/लाभार्थ्यांना पैशांचे आर्थिक आमिष किंवा मोबदला घेऊन पुरवल्या. तसेच, पुरावा नष्ट करणे- परीक्षा संपल्यानंतर त्यांनी लीक झालेल्या प्रश्नपत्रिकांच्या प्रती नष्ट केल्या, जेणेकरून पोलिसांना पुरावे मिळू नयेत, असे अनेक आरोप मनीषा वाघमारेवर करण्यात आले आहेत.
दरम्यान, अटक झाल्यानंतर त्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा पेपर दिला होता, त्या सर्वांची नावे आणि तपशील पोलिसांकडे उघड केलेले नाहीत, त्यामुळे तपासात अडचण येत असल्याचा सीबीआयचा आरोप आहे. याप्रकरणी, सीबीआकडून आणखी तपास सुरू आहे.




