लग्न मोडून कुटुंबाला वाईट वाटण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं; सिया गोयलचा धक्कादायक खुलासा

लग्न मोडून कुटुंबाला वाईट वाटण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं; सिया गोयलचा धक्कादायक खुलासा

पुणे (प्रतिनिधी): केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना घटनास्थळी नेऊन पोलिसांनी संपूर्ण घटनेचा सीन रिक्रिएट केला. यावेळी केतन अग्रवालची हत्या नेमकी कशी करण्यात आली, याची सविस्तर माहिती तपास पथकाने पडताळून पाहिली.

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना लोहगडावर आणले. याच ठिकाणी केतन अग्रवालला दरीत कशा प्रकारे ढकलण्यात आले, याचा घटनाक्रम दोघांकडून समजून घेण्यात आला. लोहगड किल्ल्यावरील हत्ती तलावाजवळील दरीत केतनला ढकलल्याचा आरोप या दोघांवर आहे. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करत पोलिसांनी संपूर्ण सीन रिक्रिएट केला.

या प्रकरणाच्या चौकशीत सिया गोयलने धक्कादायक कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान तिने, "लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणे सोपे वाटले," असे सांगितल्याचे समोर आले आहे. या कबुलीनंतर तपासाला नवे वळण मिळाले असून, पोलिसांकडून या प्रकरणातील विविध पैलूंची पडताळणी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात होणारे लग्न मोडल्यास कुटुंबांच्या भावना दुखावल्या जातील, अशी भावना सियाच्या मनात होती. त्यामुळे लग्न रद्द करण्याऐवजी होणाऱ्या पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे चौकशीत समोर आल्याचे सांगितले जात आहे.

केतन अग्रवालशी लग्न करायचे नसल्याने सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने कट रचल्याचा आरोप दोघांवर आहे. या कटानुसार केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले आणि हत्ती तलावाजवळील दरीत ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.