‘आज मला कांदे भेट दिले असते तर घरी नेले असते’; कांद्याच्या वाढलेल्या दरावर देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य

‘आज मला कांदे भेट दिले असते तर घरी नेले असते’; कांद्याच्या वाढलेल्या दरावर देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य

मुंबई (प्रतिनिधी) : ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ या तत्त्वावर संस्थेचं काम सुरू आहे. अनेक थोर व्यक्तींचे आशीर्वाद या संस्थेला लाभले आहेत. दोन लाखांहून अधिक विद्यार्थी आणि दोन हजारांहून अधिक शिक्षक असणारी ही राज्यातील अग्रगण्य संस्था आहे. नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणीत या संस्थेचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील कार्यक्रमात काढले.

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी मला बोलावलं, त्याबद्दल आभारी असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.नाशिक जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा आहे. देशाच्या द्राक्ष निर्यातीपैकी तब्बल ८० टक्के निर्यात नाशिक जिल्ह्यातून होते. यावेळी कांद्याच्या दरावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिश्किल टिप्पणी केली.

“आमच्या डोळ्यात वर्षातून दोनदा कांदा पाणी आणतो. आता कांद्याला भाव चांगला आहे. त्यामुळे या कार्यक्रमात कांद्याची भेट मिळाली नाही. नाहीतर एका तरी कार्यक्रमात कांद्याची भेट मिळते. आता कांद्याला भाव जास्त आहे, त्यामुळे कांदे भेट दिले असते तर घरी तरी नेले असते,” असं मिश्किल वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.आपला शेतकरी राबतो, मेहनत घेतो. त्याचा उत्पादन खर्च वाढत आहे. वाढत्या किमतींच्या तुलनेत हमीभाव समाधानकारक नसतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही भाव ठरतो, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शेती क्षेत्रात संशोधन होणं गरजेचं आहे. खतांच्या व्यवस्थापनासह अनेक बाबींवर काम करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे इतर राज्यांमध्ये जमिनीचा पोत खराब होऊन उत्पादकता कमी होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात वाळवंट असूनही कमी पाण्यात शेती करून तिथे क्रांती घडवण्यात आली. त्याच धर्तीवर आपणही काम करत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शेती क्षेत्रात AI चा वापर करून उत्पादन खर्च २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्यासोबतच उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी अॅप तयार करण्यात आलं असून मशागतीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. शेतकरी विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरंही या अॅपच्या माध्यमातून मिळतात.या अॅपचा वापर करून शेतकऱ्याने आपल्या उत्पादनाचा फोटो काढला, तर पुढील काळातील हवामान, कोणते रोग येऊ शकतात आणि त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबतही मार्गदर्शन मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

तरुण पिढी शेतीपासून दूर जात आहे. अशा कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून तरुणांना पुन्हा शेतीच्या जवळ आणता येईल. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातूनही मोठ्या संधी निर्माण करता येतील, असं फडणवीस म्हणाले.शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना सुरू केली आहे. मात्र, शेतकरी वारंवार कर्जाच्या फेऱ्यात अडकतो. त्यामुळे त्याला या परिस्थितीतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी फायदेशीर आणि आधुनिक शेतीकडे वळवण्याचे प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.